घोड्याचा खरा मालक कोण ?

घोड्याचा खरा मालक कोण ?
अकबर बिरबल
घोड्याचा खरा मालक कोण ?
अकबर बिरबल 
एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. 
घोड्याचा खरा मालक कोण ?
कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता. 
कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले. 

बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले. 
तो म्हणाला “हुजूर, हा घोडा माझा आहे. मी माझ्या गावातुन घोड्यावर बसुन दिल्लीत कामासाठी निघालो होतो. हा माणुस मला रस्त्यात भेटला. तो लंगडत चालत होता. त्याने मला विनंती केली कि मलासुद्धा दिल्लीत यायचे आहे. तुम्हीही तिकडेच जात आहात तर कृपया आपल्या घोड्यावर मला पण घेऊन चला. 
आता फारसं अंतर उरलं नव्हतं म्हणुन मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो. पण नंतर हा बदमाश माणुस घोडा माझा आहे आणि तू घोड्याला सोडुन निघ म्हणायला लागला. म्हणुन आमचं भांडण सुरु झालं.” 

बिरबलाने दुसया माणसाला विचारले. 

“हुजूर, हा माणुस खोटे बोलतोय. खरं तर मला चालायला त्रास होतो म्हणुन मी हा घोडा वापरतो. मी दिल्लीला येत असताना हा माणुस मला भेटला. तो म्हणाला माझे पाय खुप दुखत आहेत, तर मला दिल्लीपर्यंत घोड्यावर घेऊन चला. मी त्याची विनंती मान्य केली. नंतर तो म्हणायला लागला हा घोडा माझाच आहे. म्हणुन आमचं भांडण सुरु झालं.”
दोघेही सारखीच हकीकत सांगुन दुसऱ्यावर आरोप करत होते. दोघेही परगावचे असल्यामुळे त्यांना ओळखणारे आणि शहानिशा करणारे कोणी नव्हते. 
बिरबलाने त्यांना सांगितले कि घोडा इथेच ठेवा आणि उद्या सकाळी परत या. मग मी निकाल देईन. 
दुसऱ्या दिवशी ते आले तेव्हा त्याच घोड्याच्या उंची आणि रंगाचे आणखी काही घोडे तिथे बिरबलाने मागवले होते. बिरबलाने त्यांना सांगितले कि घोड्याजवळ जा आणि आपला घोडा ओळखा. 
दोघे घोड्यांजवळ गेले आणि घोडे बघू लागले. लंगड्या माणसाला घोडा ओळखताच आला नाही. त्या व्यापाऱ्याने मात्र आपला घोडा बरोबर ओळखला आणि तो जवळ आला कि घोडासुद्धा आपल्या मालकाला पाहुन लाडात आला. 
बिरबलाने घोड्याकरवीच त्याच्या खऱ्या मालकाची ओळख केली होती. 
बिरबलाने व्यापाऱ्याला त्याचा घोडा दिला आणि त्या लंगड्या माणसाला फसवणुकीची शिक्षा दिली. 

तात्पर्य :- खोटं कितीही रेटून बोलल तरी सत्य बाहेर येतच.

Comments